वैजापूर : येथे ईदचा बाजार सजला असून खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची झुंबड उडाली आहे. सुकामेवा, अत्तर, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा १८ टक्के जीएसटीमुळे तब्बल १५० ते २०० रूपयांनी सुकामेवा महागला आहे.शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारात सध्या १५० ते २०० स्टॉलधारक आहेत़ यामध्ये आवश्यक सर्व वस्तूंचा समावेश आहे. खरेदीसाठी शहर व तालुक्यातून दररोज मोठी गर्दी होत आहे. गांधी मैदान, टिळक रस्त्यावरील बाजार फुलला आहे. मात्र, शिरखुर्मा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ड्रायफ्रूटला यंदाच्या वर्षी दरवाढीमुळे मागणी घटली आहे, अशी माहिती व्यापारी जुबेर वाजेद पठाण यांनी दिली.रमजान महिन्यात उपवासानंतर खाण्यासाठी आवश्यक असलेले खजूर विक्री करणारे स्टॉलही बाजारात आहेत. १०० रुपयांपासून ३ हजार रुपये किलोपर्यंतचे खजूर विक्रीसाठी आहेत. मरियम, सुल्तान, रतन, मोजरब, केमिया, फरीद, कलमी, कफकफ आदी विविध प्रकारचे खजूर बाजारात आहेत. आजवा खजूर २८०० ते ३००० रुपये किलो आहेत. खजुराला यंदा मोठी मागणी आहे. वैजापुरात अत्तराला दरवर्षी मोठी मागणी असते. ग्रीन मुश्क, चॅलेंज, ओन्ली वन, गुलनाज, गुलमोहर, डी लव्ह, फिरदोस, असिल, रॉयल प्रोफेसी, तुफान, हुदा आदी १०० प्रकारचे अत्तर सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.२० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत अत्तराची किंमत असून, रमजानमध्ये याला खूप मान असतो.अत्तराचा साबण प्रथमच बाजारातयंदाच्या वर्षी प्रथमच अत्तराचा साबण बाजारात दाखल झाला आहे. ईदमध्ये महिलांना सजण्यासाठी आवश्यक असलेली ज्वेलरीची विक्री करण्यासाठी गांधी मैदानात अनेक स्टॉल सजले आहेत. कानातील विविध फुले, गळ्यातील आकर्षक दागिने, हातातील बांगड्या, नेलपेंट, मेहंदी विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत. नर्गिस, कॅटरिना, करिना, प्रेम दुल्हन, हिना आदी विविध प्रकारच्या मेहंदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत सर्वांसाठी बेल्ट,पॉकेट, गॉगल्स,चप्पल, बूट, सँडल विक्रीचे स्टॉल लागले आहेत. महिलांचे खास आकर्षण असलेल्या बांगड्या खरेदीसाठी गर्दी होत असून यामध्ये जयपूर आणि हैद्राबादी बांगड्यांना मोठी मागणी आहे.चटोरी गल्लीत खवय्यांची गर्दीरमजान ईदनिमित्त दरवर्षी आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शहरातील चटोरी गल्लीत यंदाही शेरूभार्इंनी रगड्याची भेट देऊन ग्राहकांना समाधानी केले आहे. टिकिया पाव, समोसे, भजे आदींसह विविध प्रकारचा खिचडा तयार करणारे पदार्थ लोकप्रिय ठरले आहेत. यंदा रबडीबरोबर दाल वडे व पकोडे तयार केले आहेत. खास रमजाननिमित्त खरेदी करण्यासाठी येथे लोकांची मोठी गर्दी होत आहे.
वैजापुरात ईदचा बाजार सजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:18 AM