औरंगाबाद : शहराला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, बीड बायपास रोडवरील अथर्व रॉयल सोसायटीमध्ये ९९ फ्लॅटला मागील ५ वर्षांपासून पाईपलाईनद्वारेच गॅस पुरवठा केला जात आहे. एवढेच नव्हे तर सौरऊर्जाचे पॅनल बसवून सोसायटी अंतर्गत विजेची मागणी पूर्ण केली जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे नुकताच पुणे येथे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या वतीने दिल्या जाणारा सौरऊर्जा निर्मितीसाठीचा गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कारही या सोसायटीला मिळाला आहे. याद्वारे या गृहनिर्माण संस्थेच्या स्वावलंबन कार्याची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी दूरदृष्टीचे असतील त्या गृहप्रकल्पाच्या परिसराचा कसा कायापालट होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे अथर्व रॉयल सोसायटी ठरत आहे. येथे तीन अपार्टमेंटमध्ये ९९ फ्लॅट आहेत. येथील कोणत्याही फ्लॅटच्या किचनमध्ये गॅस सिलिंडर दिसणार नाही. कारण सर्वांचे सिलिंडर खालीच तयार करण्यात आलेल्या ‘गॅस चेंबर’ मध्ये ठेवले जातात. येथून ९९ फ्लॅटच्या किचनपर्यंत गॅस पाईपलाईन पोहोचविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक फ्लॅटमध्ये मीटरही बसविण्यात आले आहे. कोणी किती गॅस वापरला याची लगेच नोंद होते. त्यानुसार फ्लॅटधारकांना महिन्याची पैसे द्यावे लागतात.
या सोसायटीअंतर्गत पथदिवे, लिफ्ट, सर्व सार्वजनिक दिवे, विद्युत मोटारी या सर्वांचे महिन्याचे बिल ६० ते ७० हजार रुपये येत होते. यासाठी संस्थेने तीन अपार्टमेंटवर ९६ सोलार पॅनल बसविले. यातून ३० के.व्ही. वीज निर्मिती होते. यामुळे महिन्याकाठीच्या ७० हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच सर्वांना गरम पाणी मिळण्यासाठी ३४ सोलार वॉटर युनिट गच्चीवर बसविण्यात आले आहेत. याद्वारे सर्व फ्लॅटमध्ये गरम पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. संपूर्ण सोसायटीत रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. यामुळे साठणाऱ्या पाण्याचा आसपासच्या सोसायटीतील बोअरला फायदा झाला आहे. तेथील पाणीपातळी वाढली आहे. हेच पाणी सोसायटीअंतर्गत झाडे व बागेला वापरले जाते. एवढेच नव्हे तर सुरक्षिततेसाठी अग्निशमन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
संपूर्ण सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सध्या येथे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी येथील रहिवाशांचे प्रयत्न आहेत. स्वयंपूर्ण होण्यासाठी सोसायटी प्रयत्न करीत असल्याची माहिती अध्यक्ष चंद्रकांत देशपांडे यांनी दिली. सोसायटीअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी बाबासाहेब जावळे, मेघा गिरमे, सर्मिती पाल, त्र्यंबक बोंदरे, प्रल्हाद घाटगे, विलास कौटीकवार, नरेंद्र शर्मा, रमण सुराणा आदी परिश्रम घेत आहेत.
ओला-सुका कचरा वर्गीकरणअथर्व रॉयल या सोसायटीत ओल्या-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. यासाठी येथे शेड तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक फ्लॅटमधूनच ओला-सुका कचरा वेगवेगळा करून दिला जातो. तो शेडमध्ये असलेल्या प्लास्टिक ड्रममध्ये साठविला जातो. सध्या मनपाद्वारे येथील कचरा उचलला जात असून, येत्या आठवडाभरात सोसायटीच्या जागेतच ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. हेच खत बागेत, झाडांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुरेश जोशी यांनी दिली.