औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी औरंगाबादेतील उद्योग आणि उद्योग संघटनांनी केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या मदतीची राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवर दखल घेण्यात आली असून, उद्योग विभागामार्फत राज्यातील उद्योगांसमोर हे ‘रोल मॉडेल’ ठेवले जाणार असल्याचे ‘सीमआयआय’चे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.
‘सीआयआय’, ‘सीएमआयए’, ‘मासिआ’ आणि औरंगाबाद फर्स्ट यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गुरुवारी मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर्स मिळत नव्हते. ही परिस्थिती पाहून औरंगाबादेतील उद्योगांनी घाटी हॉस्पिटल तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत शासकीय रुग्णालयांना ‘सीएसआर’ फंड तसेच काही उद्योगांनी वैयक्तिकस्वरूपात वैद्यकीय उपकरणे देण्यासाठी पुढाकार घेतला. औरंगाबादेत सुमारे ८ ते ९ कोटी, तर मराठवाड्यात जवळपास १५ कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची मदत करण्यात आली. उद्योग संघटनांच्या या उपक्रमाची दखल राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर निती आयोगानेही घेतली. एवढेच नव्हे तर न्यायालयानेही या उपक्रमाचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित तसेच स्थानिक कामगारांना २५ लाख अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. यंदा ४३ आयसीयू व्हेंटिलेटर्स, ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचा अहवाल तातडीने मिळावा म्हणून आर्टिपीसीआर यंत्र, १ लाख ‘आरटीपीसीआर किट’, १४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी घाटीला विदेशी बनावटीचे ४० कॉन्सन्ट्रेटर दिले. हे कॉन्सन्ट्रेटर फ्रान्स आणि अमेरिकेतून मागविण्यात आले. उद्योगांत कामगारांसाठी कोरोना चाचणी, लसीकरण, रक्तदान शिबिरे घेण्यात आली.
मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सर्वात अगोदर औरंगाबाद फर्स्टने ‘गॅस दाहिनी’ची संकल्पना पुढे आणली आणि अवघ्या तीनच दिवसांत उद्योगांसहीत अनेकांच्या मदतीने ३१ लाख रुपयांचा निधी जमा झाला. ही दाहिनी कैलासनगर स्मशानभूमीत उभारली जात असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती कार्यान्वित होईल.उद्योग संघटनांच्या या उपक्रमाला स्थानिक प्रशासनाचेही मौलिक सहकार्य लाभल्याचा आवर्जून उल्लेख यावेळी करण्यात आला. यावेळी श्रीराम नारायणन, रमण अजगावकर, प्रसाद कोकीळ, शिवप्रसाद जाजू, प्रितेश चटर्जी आदींची उपस्थिती होती.
घाटीत ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी योगदान‘सीएमआयए’च्या पुढाकाराने घाटी हॉस्पिटलमध्ये १ कोटी ४० लाख रुपयांचा कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात येत असून, येत्या ७ जून रोजी त्याचे रीतसर लोकार्पण केले जाईल. यामाध्यमातून दरमिनिटाला ६०० लिटर अर्थात दररोज १२५ सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होऊ शकणार आहे. यामुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे या संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले.