छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एक सारखे हस्ताक्षर असल्याचा तदर्थ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांची चौकशी झाली. या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे संबंधित विद्यार्थ्यांनी लेखी दिले. त्यानंतर गुरूवारी विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर केला, असे बोर्डाचे प्रभारी सचिव विजय जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, बीड, हिंगोली जिल्ह्यातील भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांची तपासणी ही फर्दापूर परिसरातील प्राध्यापकांकडे होती. त्यामुळे हा प्रकार त्याच परिसरात झालेला असावा, असा निष्कर्ष काढून बोर्डाने अगोदर निकाल जाहीर केला व नंतर फर्दापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यासंबंधी मॉडरेटर्स आणि प्राचार्यांची चौकशी अद्याप बाकी आहे.
मॉडरेटर्संनी भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल असल्याची तक्रार केल्यानंतर विभागीय शिक्षण मंडळाने ९ ते १३ मे दरम्यान बीड व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ४००हून विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नाही. आमच्या भवितव्याशी खेळण्याचा कोण तरी प्रयत्न करतेय, असे बोर्डाकडे लेखी दिले. त्यानंतर मग बोर्डाने केंद्रसंचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरिही विभागीय शिक्षण मंडळाचे अधिकारी या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेली. उत्तरपत्रिकांना नेमके कोठून पाय फुटले, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडून हा प्रकार घडला की त्याच्या समंतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली. हा सारा खटाटोप कोणाच्या सांगण्यावरुन केलेला असावा, असा हा साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे.