औरंगाबाद : हिपॅटायटिस या आजाराला बोली भाषेत कावीळ असे म्हणतात. अल्पकालीन हिपॅटायटिस ४ ते ६ आठवड्यापर्यंत राहू शकतो. तर दीर्घकालीन हिपॅटायटिस आयुष्यभर राहू शकतो. संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे, त्याच धर्तीवर हिपॅटायटिसबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून पाळला जातो. पोटातील सर्वात मोठा अवयव यकृत म्हणजे लिव्हरवर सूज येण्याला हिपॅटायटिस म्हटले जाते. यकृत हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. जेवणाचे पचन करण्यात, ऊर्जा जमा ठेवण्यात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.
हिपॅटायटिसचे प्रकार
- हिपॅटायटिस ए, बी, सी, डी व ई.
- अल्कोहोलिक हिपॅटायटिस.
- नाॅन अल्कोहोलिक स्टियटो हिपॅटायटिस.
- ऑटो इम्युन हिपॅटायटिस
------
लक्षणे काय आहेत ?
-हिपॅटायटिस साधारण कोणत्याही संक्रमणामुळे होऊ शकतो.
- हिपॅटायटिस ए, बी, सी, डी किंवा ई विषाणूंसोबत विषाणू जन्य संसर्ग.
- मद्य प्राशन.
- आनुवंशिक किंवा पर्यावरणीय घटकांमुळे ऑटो इम्युनरोग.
- नाॅन अल्कोहोलिक स्टियटो हिपॅटायटिससारखे मेटॅबाॅलिक रोग.
- वेदनाशामक आणि ताप कमी करणारी औषधी जास्त प्रमाणात घेणे.
-------
निदान आणि उपचार कसे केले जातात?
रक्ताची चाचणी व सोनोग्राफी करून, तसेच लिव्हरची बायोप्सी करून निदान केले जाते. गरज पडल्यास एंडोस्कोपीही करावी लागू शकते. अँटिबाॅडीजची माहिती करून घेण्यासाठी इतर चाचण्या केल्या जाऊ शकतात. हिपॅटायटिसच्या प्रत्येक प्रकारासाठी रक्ताच्या चाचण्या ठरावीक असतात. अल्पकालीन हिपॅटायटिस बहुतेकदा बेडरेस्ट आणि औषधी घेतल्याने बरा होऊ शकतो.
----
मद्यप्राशन, चरबीयुक्त आहार टाळावा
मद्यप्राशन, चरबीयुक्त आहार टाळला पाहिजे. गंभीर प्रकरणात लिव्हर सिराॅसिस, लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो किंवा यकृत निकामी पडण्याचा धोका असतो. अशावेळी यकृत प्रत्यारोपण आवश्यक ठरू शकते. व्हायरल हिपॅटायटिस बी, सी, हे संसर्ग झालेल्या शरीरातील द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्याने पसरले जाऊ शकते. त्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक वस्तू वापरण्याचे टाळले पाहिजे. ‘हिपॅटायटिस बी’साठी लसीकरण उपलब्ध आहे.
- डाॅ. चेतन राठी, कन्सल्टंट गेस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, मेडिकव्हर हाॅस्पिटल