लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील श्रीस्वामी समर्थ केंद्रात सोमवारी सकाळी चारच्या सुमारास चोरी झाली. यात केंद्रातील पंचधातुच्या मूर्तीसह, सोन्याचा मुकूट, चांदीची छत्री असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. केंद्रातील सिसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. एक तरूण व एक तरूणी असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सेवेकºयांनी सांगितले.वसमत येथील बँक कॉलनी भागात श्रीस्वामी समर्थ केंद्र आहे. रविवारी रात्री पाऊस पडत असल्याने रात्रीच्या वेळी केंद्रात राहणारे सेवेकरी खोलीत झोपले होते. चोरट्यांनी केंद्रात प्रवेश करून मंदिराचे चॅनलगेट वाकवून श्रीस्वामी समर्थांची पंचधातुची मूर्ती सोन्याचा मुकूट, चांदीची छत्री असा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी दानपेटीलाही फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. चोरीची घटना सकाळी दर्शन व पुजेसाठी आलेले सेवेकरी योगेश गट्टाणी यांच्या लक्षात आली. याप्रकरणी योगेश गट्टाणी यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. डीवायएसपी शशिकिरण काशीद, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली २० ते २५ वर्ष वयोगटातील एक तरूण व तरूणी या चोरीत सहभागी असल्याचे सिसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी श्वान पथकास पाचारण करून तपास सुरू केला आहे. या घटनेने भाविकांत तीव्र भावना व्यक्त होत आहेत.वसमत तालुक्यातील आसेगाव येथील जैन मंदिरात चोरी झाल्याच्या घटनेने भाविक हादरले होते. त्या चोरीचा तपास लावण्यात अद्याप वसमत ग्रामीण पोलिसांना यश आलेले नाही. नेहमीप्रमाणे गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. आसेगाव जैन मंदिराच्या चोरीचा तपास लागण्यापूर्वीच श्रीस्वामी समर्थ केंद्रातील मूर्तीची चोरी झाल्याने भाविकांत भीतीचे वातावरण आहे. आता या मंदिरातील चोरी करणारी टोळी वसमत तालुक्यात किती धुमाकूळ घालणार याची चर्चा सुरू झाली आहे.
वसमत येथे पुन्हा मूर्ती चोरीचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:30 AM