छत्रपती संभाजीनगर : मोकाट कुत्र्यांचा त्रास आजचा नाही. अनेक वर्षांपासूनचा हा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. महापालिका दरवर्षी कुत्र्यांचे प्रजनन कमी व्हावे म्हणून लाखो रुपये खर्च करते म्हणे; पण परिस्थितीत किंचितही सुधारणा नाही. कुत्रा चावल्यास पंजाब, हरयाणात रुग्णाला १० हजार रुपये देण्यात येतात. आपल्याकडे साधे इंजेक्शन घेण्यासाठी महापालिका आणि घाटी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.
शहरात मोकाट कुत्रे किती, यावर वेगवेगळे आकडे समोर येतात. महापालिकेचा अंदाज ४० हजार आहे. सामाजिक संघटना, श्वानप्रेमींच्या मते ८० ते ९० हजार आहे. शहराच्या विविध भागांत वसाहतींमध्ये कुत्र्यांच्या झुंडी दिसतात. रात्री या झुंडीच्या बाजूने जाणे म्हणजे अनेकांचा थरकाप होतो. महापालिका खासगी संस्थेच्या मदतीने दररोज १५ ते २० कुत्रे पकडून आणते. त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून सोडून देते. बहुतांश कुत्र्यांना ॲन्टी रेबीज लसही दिल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात हीसुद्धा व्यवस्था नाही. मागील आठवड्यात शहरापासून हाकेच्या अंतरावरील दुधड येथील ८ वर्षांच्या चिमुकल्याचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याने मृत्यू झाला. रुग्ण मेल्यानंतरही शासन, महापालिका एक रुपयाचीही मदत करीत नाही, हे विशेष.
रोज ८ ते १० जणांना चावाशहरात रोज कुत्रा चावल्याचे ८ ते १० रुग्ण येतात. बहुतांश जणांना गल्लीतील कुत्रा चावलेला असतो.
मनपा आणि घाटी रुग्णालयात प्रत्येकी एक लसमहापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कुत्रा चालवलेल्या रुग्णांना ॲन्टी रेबीज व्हॅक्सीन (एआरव्ही) देण्यात येते. जिथे जखम असेल तेथे ॲन्टी रेबीज सिरम (एआरएस) देण्यात येते. ही लस फक्त घाटी रुग्णालयातच मिळते.
शासकीय रुग्णालयात दरवर्षी एक हजार रुग्णघाटीत दरवर्षी कुत्रा चावल्याचे किमान १ हजारांहून अधिक रुग्ण असतात. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. काही गंभीर जखमी अन्य जिल्ह्यांतूनही येतात. अनेकदा घाटीत इंजेक्शन नसल्यास रुग्णांच्या नातेवाइकांना हजारो रुपये खर्च करून दुकानातून इंजेक्शन घ्यावे लागतात.
कुत्र्यांच्या नसबंदीसाठी दरवर्षी ८० लाखमहापालिकेकडून अनेक वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम राबविण्यात येतो. या कामासाठी खासगी संस्था नियुक्त असून, नसबंदीवर दरवर्षी ८० लाख रुपये खर्च होतात.
भटक्या कुत्र्यांना आवरणार कोण?शहरी भागात राहणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मोकाट कुत्र्यांना आवर घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
शासनाने निर्णय घेतला तर...पंजाब, हरयाणात राज्य शासनाने कुत्रा चावल्यास १० हजार रुपये रुग्णांना मिळतात. महाराष्ट्र शासनानेही यासंदर्भात निर्णय घेतला तर आपल्याकडेही विचार होईल.-शाहेद शेख, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा.