सिल्लोड : लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. आपण सत्तेत आहोत, कुणालाही न जुमानता सर्वसामान्य जनतेचे काम करा. जनतेच्या कामात स्वत:ला झोकून द्या, तहसील, पोलिस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयामध्ये कुणालाही त्रास झाला तर मला सांगा. मी बघून घेतो. मी तुमचे काम करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात केले.
माजी खा. रावसाहेब दानवे व माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू असलेला वाद अद्याप कायम आहे. दानवे यांनी सिल्लोड हा पाकिस्तान होत चालला आहे, अशी टीका सत्तार यांच्यावर केली होती. त्याला सत्तार यांनी प्रतिउत्तर देत, सिल्लोडची बदनामी करण्याचे काम दानवेंकडून सुरू असून त्यांना सिल्लोडमधून लीड मिळतो, त्यावेळी सिल्लोड तालुका हा पाकिस्तान वाटत नाही आणि लीड मिळाली नाही की लगेच पाकिस्तान वाटतो. त्यामुळे माझ्यावर काय ते आरोप करा; परंतु सिल्लोडची बदनामी करू नका, असे सत्तार म्हणाले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा मंगळवारी दुपारी २ वाजता मेळावा घेण्यात आला. यावेळी दानवे यांंनी सत्तार यांचे नाव न घेता, सिल्लोडमध्ये कुणी त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेतो. घाबरू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
बोलत होते. यावेळी पक्ष सदस्य नोंदणीची सुरुवात दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, मा. आ. सांडू पा. लोखंडे, प्रदेश चिटणीस मंकरद कोर्डे, चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सजन बागल, अरुण काळे, सुनील मिरकर, दिलीप दाणेकर, कमलेश कटारिया, विलास पाटील, अनिल खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंदे यांनी तर आभार युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय वानखेडे यांनी मानले.