Raosaheb Danve: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील उपस्थित भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. व्यासपीठावर भाजपा नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भविष्यात एकत्र आलो तर भावी सहकारी असा भाजपा नेत्यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबाबत रावसाहेब दानवे यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवर आलेल्या अनुभवावरुनच त्यांनी असं विधान केलं असावं, असं रावसाहेब दानवे म्हणाले. इतकंच नव्हे, तर काँग्रेसचे नेते खूप त्रास देतात...एकदा आपण बसून बोलू असं मुख्यमंत्री कानात म्हणाल्याचाही दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. मात्र, व्यासपीठावर असलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातून मुख्यमंत्री असं म्हणाले असावेत असं म्हटलं जात आहे.
'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान
मुख्यमंत्रीपदी ठाकरे चालतील का?मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर येत्या काळात शिवसेना-भाजपा पुन्हा युती झाली तर राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे चालतील का? असं विचारण्यात आलं असता दानवे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "आधी सगळं जमून येऊ देत. मग पुढे चर्चा होत राहतील. शिवसेना आणि भाजपा पूर्व मित्र होते. आता पुन्हा मित्र होण्याची शक्यता आहे", असं रावसाहेब दानवे म्हणाले. शिवसेना आमचा समविचारी पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेनं युतीचा विचार केला तर निश्चितच भाजपा त्याचं स्वागत करेल, असंही ते म्हणाले.