औरंगाबाद : वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून त्याचा वार चुकवून पोलिसांनी त्याला पकडले. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पडेगाव परिसरातील चांदमारीच्या मागे घडली.
सचिन अशोक भुजबळ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, छावणी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राजू दत्तात्रय जाधव आणि बाळू पवार हे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना अडीच वाजण्याच्या सुमारास चांदमारीमागील गल्लीत एकजण हातात चाकू घेऊन वाहनांची तोडफोड करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे दोन्ही पोलीस कर्मचारी लगेच तेथे पोहोचले तेव्हा आरोपी दुचाकींची तोडफोड करत असल्याचे त्यांना दिसले.
कोरोना संसर्गामुळे संचारबंदी असताना तुम्ही घराबाहेर कसे आलात, असे जाधव यांनी आरोपी सचिनला विचारले. त्यावेळी त्याने तुम्ही समोर आला तर एकाला खतम करीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याने पोलीस काॅन्स्टेबल राजू जाधव यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वार चुकविला आणि कॉन्स्टेबल पवार तसेच घरमालक प्रदीप काळे आणि त्यांचे भाडेकरू या सर्वांनी आरोपीला पकडले आणि त्यांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. यानंतर त्याला. छावणी पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, संचारबंदी आदेशाचा भंग करणे, वाहनांची तोडफोड करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला.