औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेली तर त्याचाही विचार करण्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र नियमांचे १०० टक्के पालन करावेच लागेल. विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित व्यापाऱ्याचे दुकान १५ दिवसांसाठी सील करण्यात येईल. शहरातील मंगल कार्यालयांमध्ये लग्नकार्यासाठी अफाट गर्दी होते आहे. सर्व मंगल कार्यालय चालकांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मंगळवारी सांगितले.
पांडेय यांनी सांगितले की, बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. रस्त्यावर मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. यापुढे व्यापाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. ग्राहकांना मास्क नसताना दुकानात प्रवेश द्यायला नको. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. यापुढे दुकानात मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान दिल्यास संबंधित दुकान मालक अडचणीत येणार आहे. १५ दिवसांसाठी संबंधित दुकान सील करण्यात येईल. शासनाने मंगल कार्यालयात फक्त ५० नागरिकांना परवानगी दिलेली आहे. सध्या कुठे पाचशे तर कुठे हजार नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सुरू आहेत. शहरातील सर्व मंगल कार्यालयांना शेवटचे अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.
लॉकडाऊन करण्याचा विचार नाही
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या चारशे किंवा पाचशे पर्यंत गेली तर याचाही विचार होईल. रुग्णसंख्या दोनशेपर्यंत गेल्यास परिस्थिती खूप हाताबाहेर गेलेली नाही असे म्हणता येईल. नागरिकांनी फक्त आणि फक्त मास्कचा वापर केला पाहिजे असेही पांडेय यांनी नमूद केले.