औरंगाबाद : माझे सासरे खा. रावसाहेब दानवे यांना सांगितले तर खा. चंद्रकांत खैरेंची उमेदवारी निश्चितपणे कापली जाईल, असा पलटवार आ. हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी खैरे यांच्यावर केला. गुरुवारी खा. खैरे यांनी आ. जाधव यांना खा. दानवे हे समजावतील असे वक्तव्य करून जावई व सासऱ्याच्या नात्यात हात घातला होता. त्याला उत्तर देताना आ. जाधव म्हणाले, खा. खैरे यांची उमेदवारी जरी युतीकडून निश्चित मानली जात असली तरी खैरे निवडून येणार नाहीत, उमेदवार बदलण्यासाठी वरिष्ठांना सुचवा, असे मी सासऱ्यांना सांगू शकतो.
खैरेंना समजायला पाहिजे की सासऱ्याऐवजी जावयाचा मान मोठा असतो. हिंदू धर्मानुसार वरचा हात, अधिकार कुणाचा असेल तर तो सासऱ्याचा नसून जावयाचा असतो. त्यामुळे सासरे मला दमबाजी करतील, समजावतील असे काही होणार नाही. माझ्या सासऱ्यांना मी विनंती केली तर ते निश्चितपणे माझे ऐकतील. मी जावई म्हणून जर खा. दानवे यांना सांगितले की, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ज्या माणसाची उमेदवारी युतीकडून अंतिम होत आहे, तेथे दुसऱ्याला उमेदवारी दिली तर ती व्यक्ती निवडून येईल तर खैरेंची उमेदवारी कापली जाऊ शकते. खैरे यांना समुपदेशाची आवश्यकता आहे. अठरापगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्या भूमिकेतूनच आ. इम्तियाज जलील शिवजयंतीत सहभागी झाले होते. खैरे यांना त्यामुळेच त्रास झाला असेल, त्यामुळेच ते चुकीची विधाने करू लागले आहेत. त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. माझे सासरे आणि मी वेगवेगळ्या राजकीय वाटेवर आहोत. आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत, असे आ. जाधव म्हणाले.
निवडून आल्यास मोदींना पाठिंबामी लोकसभा लढणार आहे. निवडून आलो तर पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना माझा पाठिंबा असणार आहे. कारण सवर्ण आरक्षणामुळे मी मोदींचा भक्त झालो आहे. माझ्या सासऱ्यांनी मला माझ्या राजकारणाबाबत काहीही सांगितलेले नाही. आम्ही एकमेकांना कुठलेही राजकीय सल्ले देत नाही. मात्र मी खा. खैरे यांना निश्चित धडा शिकवीन. त्यांना मी निवडणुकीत पाडणार हा माझा औरंगाबादकरांना शब्द आहे.