औरंंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. ही लस केवळ नोंदणी केलेल्यांना देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्ड बॉय, दवाखान्यात काम करणारे सर्व कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांनी जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. आजवर सरकारी व खाजगी रुग्णालयांतील ३३ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. काही खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली नाही.
जिल्ह्यात लसीकरण नियोजनासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ. विजय वाघ आदींसोबत चर्चा केली. लसीकरणात शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह बागकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लस देण्यात येणार आहे. ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल तेव्हा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कोणत्या दिवशी तसेच किती वाजता व कोणत्या केंद्रावर लस देण्यात येईल, या संदर्भातील एसएमएस संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. लसींसाठी कोल्ड स्टोरेजसंदर्भात नियोजन सुरु आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही डॉक्टरांना लसीकरण केले आहे, काय अशी विचारणा करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आरोग्य क्षेत्रातील नोंदणी केलेल्यांची संपूर्ण यादी ऑनलाईन पद्धतीने आरोग्य विभागाकडे उपलब्ध राहणार आहे. संबंधित व्यक्तीला लसीकरणाचा दिनांक, वेळ, लसीकरण केंद्राबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात पोलीसकोरोनाकाळात फ्रंटवर असलेले पोलीस दल, एसआरपीएफ तसेच सैन्य दलातील सदस्यांना लस देण्यात येणार आहे, त्या टप्प्यानंतर ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिक व त्यानंतर ५० वर्षांपेक्षा कमी पण इतर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन असणार आहे.