आमचे सरकार आल्यास एमएसपी कायदा बनवू, जातीनिहाय जनगणना करू: अलका लांबा
By स. सो. खंडाळकर | Updated: March 13, 2024 16:02 IST2024-03-13T16:02:08+5:302024-03-13T16:02:20+5:30
महागाई व बेरोजगारीही कमी करण्याचेही दिले आश्वासन

आमचे सरकार आल्यास एमएसपी कायदा बनवू, जातीनिहाय जनगणना करू: अलका लांबा
छत्रपती संभाजीनगर : आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करू, जातीनिहाय जनगणना करू तसेच महागाई व बेरोजगारीही कमी करू, असे आश्वासन अ. भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी मंगळवारी येथे दिले.
त्या गांधी भवनात महिला मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे होत्या. राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर २२ राज्यांचा व ३० शहरांचा दौरा करून त्या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. येथूनच त्या दुपारी धुळ्याकडे रवाना झाल्या. आज, बुधवार, दि. १३ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धुळ्यात- महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. या यात्रेचे त्या तिथे स्वागत करतील.
दहा वर्षे झाली सत्ता भोगताय, मग आताच सीएए लागू करण्याची गरज का पडली?, मतांच्या ध्रुवीकरणासाठी व ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप लांबा यांनी केला. वीस लाख लोक देश सोडून गेले त्याचे काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, लोकसभेत चारशे जागा यांना कशाला पाहिजेत? संविधान बदलण्यासाठी? यासाठी पाशवी बहुमत हवे असेल तर काँग्रेस तसे होऊ देणार नाही.
भाजप सरकारच्या महिला आरक्षण धोरणावर अलका लांबा यांनी टीका केली. केवळ गाजावाजा करून महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. परंतु, हा एक चुनावी जुमला होता, हे आता लक्षात येतंय. काँग्रेसचे सरकार आल्यास महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल व ओबीसी महिलांनाही आरक्षण दिले जाईल. देशातील यापुढील सरकार इंडिया आघाडीचे राहणार असून, असा ठाम विश्वास लांबा यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपाली मिसाळ, विद्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.