औरंगाबाद : महाविकास आघाडीकडून खूप अपेक्षा आहेत. पण हे सरकार विशेषतः सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पुरेसे गंभीर नसल्याने दलित अत्याचाराबाबत महाराष्ट्र देशात तिसरा आहे. हे सर्व पाहता आगामी निवडणुका एकतर आम्ही स्वबळावर लढू. तसेच शिवसेना, भाजप आणि एमआयएमकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज़ोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.
कायदे बदला अशी कधी मागणी होत नाही. परंतु ॲट्राॅसिटी कायदा बदला अशी मागणी का होते, केंद्र सरकारने हा कायदा कडक केला. पण त्याची कठोर अंमलबजावणी का होत नाही, असे सवाल उपस्थित करून अन्याय - अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा घेणार आहोत. सामाजिक न्याय खात्याचा निधी वेळोवेळी इतरत्र वळविण्यात येत असल्याचे कवाडे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आमचाही वाटा आहे. पण मंत्रिपद व आमदारकी द्या सोडून. निदान सत्तेतला ठरल्यानुसार वाटा तरी द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत. आम्ही आता वंचित राहिलो नाहीत, बाबासाहेबांमुळे आम्ही १९५६ सालीच संचित झाल्याचा टोला प्रा. कवाडे यांनी लगावला. यावेळी जयदीप कवाडे, जे. के नारायणे, लक्ष्मण कांबळे, रामदास लोखंडे, अशोक जाधव, प्रकाश जाधव, चरणदास इंगोले, राहुल प्रधान, गणेश बनवणे, संजय सोनवणे आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते.