औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील नियोजित सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर न्यायालयातून परवानगी मिळवू, अशी भूमिका मनसेने शुक्रवारी मांडली. दुसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी १ मे रोजी होणाऱ्या सभेमुळे शहरातील वातावरण खराब होण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान, मनसेने नागरिकांना घरोघरी जाऊन सभेसाठी निमंत्रण पत्रिका देण्याची तयारी सुरू केली आहे. सभेची पहिली पत्रिका ग्रामदैवत संस्थान गणपतीला विधीवत अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
मनसेने १ मे रोजीच्या सभेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील तीन दिवस सर्व नेते येथे ठाण मांडून आहेत. परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी गरवारे स्टेडियमवर सभा घेण्याची सूचना केली, परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळावरच सभेसाठी हट्ट धरला आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणालेपोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी सांगितले, मनसेच्या सभेला परवागनी देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
शिवसेनेला काय म्हणतेयशिवसेनेचे माजी खा.खैरे यांनी मनसेच्या सभेमुळे शहरातील वातावरण खराब होण्याची भीती व्यक्त केली आहे.
मनसेचा न्यायालयात जाण्याचा इशारापक्षप्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले, अजून पोलिसांकडून अधिकृतपणे काही कळविलेले नाही. जेव्हा त्यांच्याकडून काही उत्तर येईल, त्यानंतर आमची भूमिका ठरेल. सभेला परवानगी न मिळाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला.