औरंगाबाद : राज्यात आगामी निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रितपणे लढण्याचा विचार करीत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविल्यास स्थानिक राजकारणातील समीकरण बदलू शकते, असा विश्वास दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना वाटत आहे. मात्र, कॉंग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पातळीवर युती करण्याची मुभा दिली तर आम्हीसुद्धा महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतो, असा पर्यायही कॉंग्रेसने दिला.
औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल २०२०मध्ये संपली. मागील पंधरा महिन्यांपासून सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीसंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. १ जुलै रोजी निवडणूक याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही आता मनपा निवडणुकीशी जोडला गेला आहे. निवडणूक कधी होईल, हे निश्चित नसले तरी राजकीय वारे वाहत आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सहा महिन्यात मनपा निवडणूक होईल, असे भाकीत व्यक्त केले. त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.
राज्याच्या महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन पक्ष यापुढील निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. आगामी मनपा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढल्यास शहरातील राजकीय समीकरणे बदलतील. मनपात बहुमतासाठी लागणारे ५६ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटत आहे. कॉंग्रेसने सावध पवित्रा घेतला. पक्षश्रेष्ठींनी वारंवार स्वतंत्रपणे मनपा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ऐनवेळी श्रेष्ठींनी आदेश दिल्यास कॉंग्रेसही महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
चौकट...
भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच ध्येय
आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर महाविकास आघाडीला एकत्रितपणे निवडणूक लढल्यास फायदा होणार आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्षातील नेत्यांनी मत व्यक्त केले आहे. मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविल्यास निश्चितच फायदा होईल.
- मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
कॉंग्रेसने स्वबळाची तयारी केली
कॉंग्रेस नेत्यांनी यापूर्वी अनेकदा मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्षही वारंवार हेच सांगत आहेत. आगामी मनपा निवडणुकीत ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर आदेशानुसार आम्ही जागा वाटून घेऊ. निवडणूक कधी होणार हे ठरताच निर्णय होतील.
डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
चौकट..
२०२० मधील मनपातील पक्षीय बलाबल
शिवसेना- २९
भाजप- २३
एमआयएम- २५
कॉंग्रेस- ११
राष्ट्रवादी- ३
बसप- ५
रिपब्लिकन पक्ष- १
अपक्ष- १८