विद्यापीठ : ६६ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी दिला पदवीचा ऑनलाइन पेपर
--
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यायची आहे. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या. पहिल्या दिवशी दोन्ही सत्रांत मिळून ६६ हजार ४४१ जणांनी ऑनलाइन पेपर दिला. सकाळी १० ते १ च्या सत्रात १० हजार ८०१ तर दुपारच्या २ ते ५ वाजेच्या सत्रात ५५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेपर दिला.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व पेपर ऑनलाइन होत आहेत. अनेक महाविद्यालयांतील आयटी समन्वयक विद्यार्थ्यांना सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यावयाची आहे. विद्यापीठ प्रशासन संबंधित महाविद्यालय व आयटी समन्वयकांना सहकार्य करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. महाविद्यालयांनी दोन आयटी समन्वयक नेमून परीक्षेच्या काळात त्यांना भ्रमणध्वनीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी सूचना द्याव्यात, असेही निर्देश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिले आहेत.