औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे; परंतु लसींच्या उपलब्ध साठ्याची आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता लसीअभावी लसीकरण केंद्रांवरून नागरिकांना माघारी फिरावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्याला मागणीएवढा पुरवठा मिळाला नाही तर लसीकरणाला खोडा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण हे शहरात होत आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांचे लसीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील, पण व्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आणि लसीकरण केंद्रांवर रांगाच रांगा पहायला मिळाल्या. ज्येष्ठ नागरिकांत लसीकरणासाठी मोठा उत्साह दिसला. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. म्हणजे ४५ वर्षांवरील व्यक्तींना व्याधी, आजाराबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविण्याची गरज नाही. जिल्ह्यात आजघडीला ११ हजार डोस उपलब्ध आहेत. हे डोस पुढील किमान ९ दिवस पुरतील. महापालिकेला प्राप्त झालेला साठा आगामी पाच दिवस पुरेल एवढा सांगितला जात आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याने नागरिकांचे पावले लस घेण्याकडे वळत आहेत. त्यात १ एप्रिलपासून लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात लस मिळाल्या नाही, तर नागरिकांच्या रोषाला आरोग्य यंत्रणेला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
४५ वर्षांपुढील ९ लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
जिल्ह्यातील लाेकसंख्या साधारण ३७ लाख आहे. या लाेकसंख्येनुसार ४५ वर्षांवरील किमान ९ लाख लाेकांना लसीकरण करावे लागेल, असे नियाेजन आराेग्य विभागाकडून केले जात आहे.
--------
मागणीपेक्षा पुरवठा कमीच,
लसींची नुसती प्रतीक्षाच
जिल्ह्यात रोज साधारण १५०० ते ३ हजार जणांचे लसीकरण होते; परंतु लसींच्या पुरवठ्यात वाढ होताना दिसत नाही. लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू होत आहे; परंतु त्यातुलनेत लसी मिळत नसल्याची स्थिती आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला जेवढ्या लसी मिळत होत्या, तेवढ्याच लसींचा पुरवठा होत आहे.
---
लसींचा आठवड्याला पुरवठा
सध्या जिल्ह्यात लसीचे ११ हजार डोस उपलब्ध आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांचे लसीकरण संपत आले आहे. केंद्राकडून लसींचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्याला आठवड्याला लसी प्राप्त होणार आहेत.
-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
----
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले
------
पहिला डोस - दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी - ३०,८२४ - १३,७५१
फ्रंटलाइन वर्कर्स- २९,२६६ - ३,८०८
ज्येष्ठ नागरिक- ४८,९७१
४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले-१७,८५१