औरंगाबाद : 'जर माझ्यासोबत आला ब्राह्मण समाजाचा राजा, तर महाविकास आघाडीचा वाजवून टाकू बाजा' अशा कवितेतून केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले ( Ramdas Athvale ) यांनी दलित आणि ब्राह्मण समाज आघाडीची हाक दिली. आज सकाळी केंद्रीय मंत्री आठवले यांचा शहरातील राजा बाजार येथील गणेश मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाने ब्राह्मण आघाडी सुरु केली असून राज्यभरात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रीय असल्याची माहिती दिली. एकेदिवशी दलित-ब्राह्मण एकत्र येतील, आम्ही भाऊ-भाऊ एकत्र बसून खाऊ असा नाराही दिला. (Minister Ramdas Aathvale on Bramhan Community)
आज ब्राह्मण समाजाने केलेला हा सत्कार खास आहे असे नमूद करून सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे याची पहिली मागणी आम्ही केली होती. आज ब्राह्मण समाजाने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात आहे, मोदी सर्व समाजांसाठी काम करतात. समजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिले. तसेच उत्तर प्रदेशात १३ टक्के ब्राह्मण समाज आहे. तो भाजपसोबत असल्याने तिथे पुन्हा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील असे भाकीतही त्यांनी यावेळी केले.
मला नको आहे तुमचे धन, कारण हा आहे अनमोल क्षणऔरंगाबादमध्ये फुलणार रिपब्लिकन पक्षाचे मळे, माझ्यासोबत आहे ब्राह्मण समाजाचे तळे
अशा कवितेमधून आठवले यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील तयारी देखील सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे दोन समाजातील दरी मिटावी असे आहेत. काही बाबतीत कोणाचा विरोध असेल तर तो विचारांमुळे विरोध आहे, त्या व्यक्तीचा यात दोष नाही. एकदिवस असा येईल की दलित-बहुजन, दलित आणि ब्राह्मण एकत्र येतील, दलित -ब्राह्मण सोबत जेऊ अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली.