औरंगाबाद - जिल्हयाचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी पाहणी करत सरकारी रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. याच दौऱ्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात त्यांनी आपले दंतोपचार घेतले. दरम्यान, भुमरेंच्या उपचारावेळी ५ मिनिटांसाठी लाईट गेल्याने डॉक्टरांसह स्टाफची मोठी तारांबळ उडाली. मात्र, यानंतर पालकमंत्र्यांनी थेट जनरेटर मंजूर केले. या घटनेवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तसेच, आता प्रत्येक सरकारी रुग्णालयात मंत्र्यानं घेऊन फिरावे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मंत्री संदीपान भुमरे यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. यावेळी, त्यांनी आपले दंतोपचार देखील घेतले. भुमरे यांच्या दातांची तपासणी केल्यानंतर हर्सूल केंद्रावरून वीज गेली अन् यंत्रणेची धावपळ उडाली. त्यानंतर तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावण्यात आले. तोपर्यंत मोबाइलचे टॉर्च लावून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ.एस.पी. डांगे म्हणाले, पाच वर्षांपासून जनरेटरचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे पडून आहे. शुक्रवारी विजेची समस्या असते. त्यानंतर, भुमरेंनी जनरेटर तातडीने मंजूर करुन घेण्याचे निर्देश दिले. आता, यावरुन अंबादास दानवे यांनी मंत्री महोदयांना टोला लगावला आहे.
सरकारी रुग्णालयात लाईट गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे कितीतरी ऑपरेशन थांबतात. परंतु, आमचे मंत्री महोदयांना त्रास झाल्याबरोबर लगेचच जनरेटर मिळाले. मग, आता सर्व दवाखान्यांमध्ये या मंत्र्यांना घेऊन जावं का? आणि तेव्हाच प्रश्न सुटतील का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
रुग्णालयात नेमकं काय घडलं
ज्युबिली पार्क परिसरात वीज गेल्यास अथवा काही अडचण झाल्यास वीज गुल होते. त्यामुळे आम्ही जनरेटरचा प्रस्ताव दिला आहे. इतर फीडरवरून आणखी वीज कनेक्शन दिल्यास चोवीस तास वीज मिळू शकते. पालकमंत्र्यांनी आता तात्पुरते जनरेटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय दंत महाविद्यालयात मराठवाडा विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दंत उपचारासाठी आले होते. त्यांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागले होते. त्यावेळी लिप्टची सुविधा नव्हती. त्या नेत्यांनी पाठपुरावा केल्यानंतर लिप्ट सुरू झाल्याची आठवण यावेळी डॉक्टरांनी सांगितली.