छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांनी ठराविक मेडिकलवरून औषधी आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी लिहून दिल्यास चिठ्ठी लिहिणाऱ्या डाॅक्टरसह थेट युनिट इन्चार्ज, विभागप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे. घाटीत जी औषधी नाहीत, ती खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील काही डाॅक्टर खासगी मेडिकलवाल्यांसाेबत मिळून गाेरगरीब रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत घाटी रुग्णालय प्रशासनानेही कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. घाटी रुग्णालयात मोफत उपचार मिळतात, मात्र औषधी मिळत नाहीत. ‘लोकमत’ने हा प्रकार वेळोवेळी समोर आणला आहे. अधिष्ठातापदी रुजू झाल्यानंतर डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी चिठ्ठीमुक्त घाटी करण्याकडे पाऊल टाकले. अशा परिस्थितीतही काही डाॅक्टर हे रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देत असल्याची ओरड होत आहे. याची दखल घेत डाॅ. सुक्रे यांनी आता चिठ्ठी लिहून दिल्याचे आढळल्यास कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
अधिष्ठातांकडे करता येईल तक्रारठराविक मेडिकलवरून औषधी आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिल्यास चिठ्ठीसह अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार करता येईल. बहुतांश नातेवाईक रुग्णांच्या उपचारात हयगय केली जाईल, या भीतीने तक्रार देण्याचे टाळतात.
मुख्य औषधी भांडारातून मिळेल औषधीवाॅर्डात औषधी नसेल तर रुग्णासाठी मुख्य औषधी भांडारातून औषधी उपलब्ध करून घेता येईल. औषधी भांडारातही औषधी उपलब्ध नसेल तर खरेदी करून ती रुग्णाला उपलब्ध करून दिली जातील, असे डाॅ. शिवाजी सुक्रे म्हणाले.