औरंगाबाद : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राजकीय नेत्यांनी त्यांची साखर कारखानदारी राखण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाड्यात येणारे नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील दूध अडवण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला.
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्यासाठी पाणी देण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात साखर कारखान्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून मराठवाड्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्याचा घाट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नाशिकच्या मंडळींनी घातला आहे. न्यायालयात प्रकरण नेऊन ऊस जगविण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला पाण्यावाचून तडफडून मारण्याचा डाव आहे. मराठवाड्यात येणारे पाणी अडवणार असाल, तर नगर जिल्ह्यातून दुधाचा एकही थेंब मराठवाड्यात येऊ दिला जाणार नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नगरचे पालकमंत्री राम शिंदे हेसुद्धा दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
शिर्डीच्या शिवसेना खासदारांचे काय?औरंगाबाद शिवसेनेतर्फे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे राम शिंदे यांच्या भूमिकांचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, शिर्डीचे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला तीव्र विरोध केला आहे. याला शिवसेनेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात बगल देण्यात आली आहे. याविषयी जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले की, नगरची शिवसेना मराठवाड्याच्या पाण्याला विरोध करीत असेल, तर त्यांची ती स्थानिक स्तरावरची भूमिका असेल. मात्र, विखे पाटील आणि राम शिंदे हे विरोधी पक्ष व मंत्रिमंडळात राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी विरोध करणे हे चुकीचे आहे.