जयंत कुलकर्णीऔरंगाबाद : महाराष्ट्राचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने मांडीला झालेल्या दुखापतीनंतरही जबरदस्त कामगिरी करताना गोल्डकोस्ट येथे गुरुवारी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेले हे सुवर्णपदक आपण गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार, वडील बाळासाहेब, आई शारदा आवारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया खास लोकमतशी बोलताना राहुल आवारे याने गोल्डकोस्ट येथून व्यक्त केली.महाराष्ट्राचा सुपुत्र राहुल आवारे याने आज ५७ किलो वजन गटात मांडीला झालेल्या दुखापतीनंतरही आणि पिछाडीवर असतानाही जबरदस्त मुसंडी मारताना कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशी याचा १५-७ असा पराभव करताना भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीतील पहिले सुवर्ण पदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. तीक्ष्ण नजर, चित्त्याची चपळाई असणाऱ्या राहुल आवारे याने थेट गोल्डकोस्ट येथून लोकमतशी विशेष संवाद साधला.राहुल आवारे म्हणाला, ‘‘गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या शिष्याने राष्ट्रकुल आणि आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकावे, असे स्वप्न होते. बिराजदार यांनीदेखील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्यांच्याप्रमाणे आपणही राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दिल्याचा अतीव आनंद आपल्याला वाटतोय. आयुष्यातील सर्वांत मोठी कामगिरी आपल्या हातून झाली आहे. गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद आपल्याला वाटतो; परंतु मामा जिवंत असते तर आपला आनंद आणखी द्विगुणित झाला असता. गुरूंची अर्धी इच्छा पूर्ण झाली आहे आणि आता त्यांची आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची इच्छा आहे. आपण ती नक्कीच पूर्ण करणार आहोत.’’राहुल आवारे म्हणाला, ‘‘गुरू हरिश्चंद्र बिराजदार स्वर्गवासी झाल्यानंतर आपल्या मनात कुस्ती सोडून देण्याचा विचार घोळत होता; परंतु पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, गुरू काका पवार, संकुलातील मल्ल, आपले आई-वडील यांचे पाठबळ तसेच महाराष्ट्राने दिलेल्या प्रेमामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत मिळालेले सुवर्ण पदक हे त्याचे फलित आहे. महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यामुळे मला लढण्याची ताकद मिळते. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून आपल्या आई-वडिलांना आनंद देता आल्याचे समाधानही मला वाटत आहे.’’राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकूनही रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघातून डावलले गेल्याची त्याला खंत आहे; परंतु आगामी काळात आणखी कामगिरी उंचावण्याची राहुलला आशा आहे. राहुल आवारे म्हणाला, ‘‘कुस्तीतील आपला अर्धाच प्रवास झाला आहे, अजूनही भविष्यात खूप कामगिरी उंचावयाची आहे. सर्वांत आधी आॅगस्ट महिन्यात आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहे आणि त्यात पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. त्यानंतर आपले मिशन आॅलिम्पिक असणार आहे. त्यासाठी परदेशात आणि भारतातही प्रशिक्षण घेणार आहोत.’’ पाकिस्तानविरुद्धच्या मल्लाशी उपांत्य फेरीचा आणि कॅनडाच्या पहिलवानाविरुद्ध अंतिम सामना खडतर होता; या दोन्ही सामन्यांत आपण पिछाडीवर होतो; परंतु आपल्याा आवडत्या मुळी या डावावर शेवटच्या तीन मिनिटांत आघाडी घेत जिंकल्याचे राहुलने सांगितले. राहुलचे हे ३० आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील १९ वे आंतरराष्ट्रीय पदक ठरले.त्याचप्रमाणे २००८ साली पुणे येथे युथ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि तुर्की येथील ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाºया पाटोद्याच्या राहुल आवारे याने २०१० ते २०१८ दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सुवर्ण पदक जिंकण्याचाही भीमपराक्रम केला आहे.
बिराजदार मामा असते तर सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद द्विगुणित झाला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:25 AM
महाराष्ट्राचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने मांडीला झालेल्या दुखापतीनंतरही जबरदस्त कामगिरी करताना गोल्डकोस्ट येथे गुरुवारी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेले हे सुवर्णपदक आपण गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार, वडील बाळासाहेब, आई शारदा आवारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया खास लोकमतशी बोलताना राहुल आवारे याने गोल्डकोस्ट येथून व्यक्त केली.
ठळक मुद्देराहुल आवारे : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण, गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार, आई-वडील व महाराष्ट्राला समर्पित