लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बोगस बियाणे कंपन्या भरपूर आहेत. दिवसरात्र कष्ट करूनही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकरी जीवन संपवित आहेत. अशा बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. या कंपन्यांची बाजू घेताल, तर शेतकरी आत्महत्येस तुम्हीच जबाबदार असाल, असे खडे बोल राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. विविध मुद्यांवरून त्यांची कानउघाडणी केली.राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पीक परिस्थितीची सोमवारी पाहणी केली. सोमवारी त्यांनी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे पीक पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कृषी विभागाबद्दल शेतकऱ्यांकडून भरपूर तक्रारी आहेत. अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापासून प्रत्येकाने शेतकऱ्यांसाठी धावपळ करावी. शासनाला दिलेल्या आठ तासांत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच त्यांच्यापर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत. कंपन्यांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी कामे करा. ज्या बियाणांच्या विरोधात तक्रारी येतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांना अनुदान असणाऱ्या योजनांचे अनुदान तात्काळ वितरित करा, त्यात चालढकल करू नका. प्रस्तावात काही गोष्टी नसतील तर स्वत: शेतकऱ्यांकडे जावे. गरज पडल्यास तलाठी, इतर अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या गोष्टींची पूर्तता करा. उन्नत शेती अभियान कायमस्वरूपी राबवा, ठिबकचे अनुदान वाटप करा, पेरणी अहवाल वस्तुस्थितीदर्शक द्या, अशा सूचनाही केंद्रेकर यांनी दिल्या.
...तर शेतकरी आत्महत्येस तुम्हीच जबाबदार असाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:59 AM