औरंगाबाद : शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेताना युवक-युवतीमध्ये ओळखीतून मैत्री निर्माण झाली. मुलगी १२ वीची. नंतर तिने त्याच्याशी संपर्क तोडला. ती बोलत नसल्यामुळे त्याने तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून युवतीचा फोटो व नावाचा वापर करीत मध्यरात्री १२ वाजता भेटायला ये, नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीसह नातेवाईकांनी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ग्रामीण सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दीपक सुभाष दराडे (१९, मूळ रा. लिंबाळा, ता. जिंतूर, जि. परभणी, ह.मु. भालगाव) असे आरोपीचे नाव आहे. १२ वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन युवतीची ओळख दीपकसोबत झाली होती. दीपक बीएच्या द्वितीय वर्षात शिकतो. त्याचे वडील चालक आहेत. दीपकने अल्पवयीन मुलीसोबत ओळखीचे रुपांतर प्रेमात व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. मुलीने त्याच्याशी संपर्कच तोडून टाकला. त्यामुळे बेचैन झालेल्या दीपकने ती भेटण्यास आली पाहिजे, यासाठी तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटच्या फ्रेंड रिक्वेस्ट तिच्या मैत्रिणींना केल्या. मैत्रिणींमुळे युवतीला बनावट अकाउंटची माहिती मिळाली. दीपकने युवतीलाही मेसेज केले. तिने दीपकला असे अकाउंट केलेस का, अशी विचारणाही केली. त्याने आपल्यालाही मेसेज येत असल्याची थाप मारली.
तिने या प्रकाराची माहिती आईवडिलांना सांगितली. त्यानंतर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात १२ एप्रिलला धाव घेतली. निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक भारत माने, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, जमादार रवींद्र लोखंडे, कैलास कामठे, संदीप वरपे, नितीन जाधव, गणेश घोरपडे, सविता जायभाय, लखन पाचोळे, गणेश नेहरकर, योगेश दारवंटे, रुपाली ढोले यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत बनावट खात्याचा शोध घेतला. तेव्हा दीपकनेच स्वत:च्या मोबाईलवरून हे बनावट खाते तयार केल्याचे उघड झाले. सायबर पोलिसांनी त्याला भालगाव येथून उचलले. त्याला न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली.
मध्यरात्री १२ वाजता भेटण्याची मागणीदीपकने युवतीला मध्यरात्री १२ वाजता एकटीच भेटायला ये, तुझे न्यूड छायाचित्र पाठव, अन्यथा तुझे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल केले जाईल. नातेवाईकांना पाठविण्यात येईल, अशी धमकी दिली होती. तिने हे घरी सांगितले.