वाळूज महानगर : घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी देणाऱ्या पतीसह ६ जणांविरुद्ध, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्नेहा दिलीप गुरव (२७, रा. बजाजनगर) या तरुणीचा तीन वर्षांपूर्वी वैभव सतीश गुरव (रा. तामजाईनगर, सातारा) या अभियंता तरुणासोबत थाटामाटात पार पडला होता. लग्नात स्नेहाच्या माहेरच्या मंडळींनी १० तोळे सोन्याचे दागिने, घरगुती साहित्य व लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी स्नेहाची चुलत सासू कल्पना गुरव हिने लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून स्नेहा, तिचा पती वैभव व सासू माधुरी गुरव यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. या वादानंतर गौरी व वेदांती गुरव या दोन्ही नणंदानी भावजई स्नेहाला आम्हाला तू आवडत नाहीस, तू खूप घाणेरडी आहेस, असे म्हणत तिला सारखे टोमणे मारून अपमानित करीत होत्या. सासरच्या मंडळींनी अनेकदा स्नेहा हीस माहेरहून पैसे आण, अशी मागणी करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला होता. तिचा पती वैभव हा मरीन अभियंता असल्याने तो ६ ते ७ महिने घराबाहेर राहतो. सासरच्यांनी तिचा अतोनात छळ सुरू केला होता. तिने पतीकडे तक्रार केली असता त्याने नातेवाइकांची बाजू घेत पत्नीलाच दोषी ठरविले. पती शारीरिक संबध ठेवण्यासही नकार देत असल्याने तिने जाब विचारल्याने त्याने मारहाण करून तिला रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगवधान राखत स्नेहाने आरडाओरडा केल्याने हा प्रयत्न थोडक्यात फसला होता.
घटस्फोटासाठी पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीसासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून स्नेहा ही बजाजनगरात माहेरी आली असता पती वैभवने सासुरवाडीत येत पत्नीसह सासू-सासऱ्यास शिवीगाळ करून वाद घातला. यानंतर पती वैभव याने पत्नी स्नेहा हिला मला घटस्फोट दे, अन्यथा तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी दिली होती.
सासरच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा या छळामुळे स्नेहा हिने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून छळ करणाऱ्या पती, सासू, पतीची मावशी शुभांगी पाटील, चुलत जाऊ अमृता गुरव, चुलत सासू कल्पना गुरव, नणंदा वेदांती गुरव व गौरी गुरव या ७ जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक जायभाये हे तपास करीत आहेत.