औरंगाबाद : वारंवार ‘प्रपोज’ करूनही तरुणी प्रतिसाद देत नसल्यामुळे ‘माझ्याशी बोलली नाहीस तर आत्महत्या करीन’ असा संदेश ‘एकतर्फी मजनू’ने पाठविला. त्यामुळे युवतीने सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. यावरून विनयभंगासह इतर कलमांन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
चैतन्य राजेंद्रबाबू ढोके (३४, रा. इन्कम टॅक्स हेडक्वार्टर) असे आरोपीचे नाव आहे. सिडको ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार चैतन्य हा २५ डिसेंबर २०२१ पासून एन ८ परिसरात राहणाऱ्या एका युवतीला सतत प्रेम संबंधासाठी प्रपोज करीत होता. दोघांची ओळख आहे. प्रेमासाठी युवतीने नकार दिल्यानंतरही त्याने तरुणीचा पाठलाग करणे सोडले नाही. अनेकदा रस्त्यात अडवून माझ्याशी बोल, असा तगादा लावला.
तरुणीने जुमानले नाही तर मोबाईल क्रमांक मिळवून फोन करून प्रपोज केले. वारंवार मेसेज करून त्रास दिला. तरुणीने नकार दिला असतानाही विनयभंग केला. ‘माझ्याशी लग्न कर’ असा तगादा लावला. ‘तू बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन’, अशी धमकी दिली. असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कैलाश अन्नलदास करीत आहेत.