छत्रपती संभाजीनगर : सिनेमा बघायचा नसेल तर पाहू नका; पण त्या सिनेमावर बंदी आणू नका. कारण सिनेमा बनविण्यामागे निर्मात्याला जे काही सांगायचे असते, ते तो त्या सिनेमातून सांगत असतो, असे प्रतिपादन ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी येथे केले.
नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ख्यातनाम सिनेदिग्दर्शक धृतमान चॅटर्जी, सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विशेष पोलिस महासंचालक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, समीक्षक मनू चक्रवर्ती, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांची उपस्थिती होती.
पहिल्यांदा दहा वर्षांपूर्वी अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी आणि यानंतर २०१९मध्ये ‘पानिपत’ सिनेमा तयार करण्यापूर्वी दौलताबाद किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आल्याचे गोवारीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मी देश- विदेशातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालो आहे. प्रत्येक महोत्सवात एक मास्टर क्लास असतो. जगभरातील उत्कृष्ट चित्रपट महोत्सवात पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी रसिकांना मिळते. सिने महोत्सवासाठीही नियम असतात. या नियमांचा अनुभव आपल्याला ‘लगान’ला आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात नेताना आला. अधिकृत प्रशिक्षण घ्यायचे होते. मात्र, एकच संस्था असल्याने ते शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मोठ्या दिग्दर्शकांचे निरीक्षण करू लागल्याचे ते म्हणाले.
‘तलवार’ उत्कृष्ट लघुपटमराठवाडा शॉर्ट फिल्म कॅटेगिरीअंतर्गत ‘तलवार’ हा लघुपट सर्वोत्तम ठरला. या फिल्मचे निर्माता सिद्धांत राजपूत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रेया दीक्षित यांचा ‘नायिका’ आणि ‘दोन ध्रुव’ हे लघुपटही उत्कृष्ट ठरले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध कॅटेगिरीतील चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.