औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. महापालिकेने मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नागरी मित्र पथक स्थापन केले. त्यांच्या मदतीला आता पोलीसही रस्त्यावर उतरून मास्क न लावलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. प्रत्येक नागरिकाला पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. दंडातील ५० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्याचा निर्णय मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला.
शहरात दररोज ३७० रुग्ण आढळून येत आहेत. मागीलवर्षीपेक्षाही संसर्ग वेगाने वाढत आहे. महापालिका व्यापक प्रमाणात उपाययोजना करीत आहे. त्याचा किंचितही फरक अद्यापपर्यंत पडलेला नाही. नागरिक राजरोसपणे मास्क न घालता फिरत आहेत. महापालिकेच्या नागरी मित्र पथकातील ४० कर्मचारी मागील काही दिवसांपासून दररोज किमान शंभर नागरिकांना दंड आकारत आहेत. आता मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंड आकारण्याचे अधिकार बुधवारपासून पोलिसांनाही देण्यात आले आहेत.
मंगळवारी सायंकाळी उशिरा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यासंबंधीचे आदेश काढले. दंडातील ५० टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला ठेवावी, असे या आदेशात म्हटले आहे.