छत्रपती संभाजीनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी चालू वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यांत तब्बल १६० ढाब्यांवर अवैध दारू विक्री, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे कारवाई केली आहे. त्याशिवाय एकूण ४१६ गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
चार महिन्यांत शेकडो जणांवर कारवाईराज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ३५, फेब्रुवारीत ४१, मार्च ३७ आणि एप्रिल महिन्यात ४७ ढाब्यांवर कारवाई केली आहे. त्याशिवाय चार महिन्यात एकूण ४१६ गुन्हे नोंदविले आहेत. त्यात ४५० आरोपींना अटक केली आहे. त्याशिवाय लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ढाबा मालकावरही कारवाईपरवाना नसताना दारू विक्रीस ठेवणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ढाबा मालकांवर गुन्हे नोंदविण्यात येतात. या गुन्ह्यात ढाबा मालकास मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येतो. त्याशिवाय त्याठिकाणचे साहित्यही जप्त करण्यात येते.
दारूच्या किमतीपेक्षा दंड जास्तउत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ढाब्यावर दारू पिताना पकडल्यानंतर होणार दंड संबंधित दारूच्या बॉटलपेक्षा जास्त प्रमाणात असतो. त्याशिवाय ढाबा मालकासही दारूच्या किमतीपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अवैध दारू विकणाऱ्या ढाब्यावाल्यांना महागात पडते.
हातभट्टीचा चालकांवर कारवाईउत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी चार महिन्यांमध्ये हातभट्टी चालकांच्या विरोधात ३७ गुन्हे नोंदवले आहेत. त्याशिवाय दारूबंदी कायद्यानुसार ९३ अन्वये २०२२-२३ मध्ये १४० प्रस्ताव दाखल केले आहेत. एप्रिल २०२३ मध्ये ४६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्याचवेळी एमपीडीए अंतर्गत एकूण २९ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
विभागाने उघडली मोहीम उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, ढाब्यांवर नियमबाह्यपणे दारू विक्रीसह पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली आहे. त्याशिवाय हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात तर मोहीमच उघडण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हातभट्टी बंद करण्यात यशही मिळत आहे.- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग