छत्रपती संभाजीनगर : मी निवडून आलाे तर मंत्री होईल म्हणून माझ्याविरोधात काम केले ते समजू शकतो, पण कन्नडमधून संजना पडली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. कशाला राजकारण करता असा सवाल करीत, माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, असा गर्भित इशारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आ. अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता दिला.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची जिल्ह्याचे पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याने शिंदेसेनेतर्फे सोमवारी रात्री संत एकनाथ रंगमंदिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजना जाधव, माजी आ. कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, पृथ्वीराज पवार, शिल्पाराणी वाडकर, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आजही सिल्व्हर ओकला कशाला जाता, पाया काय पडतात, आजही लाचारी संपली नाही, याचे दु:ख वाटते असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. आपल्याला मंत्री करू नये, म्हणून एकाने शिंदे यांना व्हॉट्सॲप पाठविला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला. पक्षातील मी वरिष्ठ आमदार असल्याने मंत्री होईल म्हणून माझ्याविरोधात काम केले ते समजू शकतो, पण संजना पडली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, मी पाच वर्षे पालकमंत्री राहील. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला.
दादागिरीचे वारे संपवायचे आहेबांगलादेशींना बडगा दाखवायचा आहे. ड्रग्जचे लोण चालू देणार नाही. कोणी गुंड समाजसेवक म्हणून वावरणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांचा धाक निर्माण व्हावा, यासाठी गुंडांना चांगले धोपटण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले.