औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने थेट गावात बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून, यात्रेमुळे होणारी गैरसोय या सेवेमुळे दूर होणार आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा प्रवासी हाच केंद्रबिंदू राहिलेला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हंगामी पद्धतीवर विविध उपक्रम एसटीतर्फे राबविले जातात. आषाढी एकादशीनिमित्तही भाविकांसाठी थेट गावात बस पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेमुळे तेथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून भाविक पंढरपूर गाठतात.
विशेषत: ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची अधिक प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे एसटी महामंडळाने थेट गावात बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार एखाद्या गावात प्रवासी संख्या पूर्ण असेल त्या गावात बस पाठवली जाणार आहे. तेथून पंढरपूर आणि पुन्हा संबंधित भाविकांना त्यांच्या गावात सोडले जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील विविध गावांतील इच्छुकांच्या गटप्रमुखांची बैठक घेऊन चर्चा करावी, तसेच तांत्रिक बाबी तपासून जास्तीत जास्त भाविकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
खाजगी वाहनांचा वापर कमी होणारएसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे गावातील भाविकांना एकत्रितपणे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खाजगी वाहनाचा वापर काही अंशी का होईना कमी होण्याची चिन्हे आहेत. प्रवाशांचा यात्रेचा प्रवास सुकर होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे, तसेच यात्रा कालावधीत परतीच्या प्रवासासाठी २४ तास आरक्षणाची व्यवस्था प्रत्येक यात्रा निवाऱ्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आठही आगारप्रमुखांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांतील गटांशी वा ग्रामस्थांशी चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार नियोजन करून परतीच्या प्रवासासह बस पुरविण्याची सुविधा एसटी महामंडळाने करून दिली आहे. याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.