संतोष हिरेमठ
औरंगाबाद : नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी बहुतांश जण आरटीओ कार्यालयातून आवर्जून आंतरराष्ट्रीय लायसन्स काढतात. कारण परदेशात विनालायसन्स वाहन चालविल्यास दंड तर होतोच; पण शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी आधी आंतरराष्ट्रीय लायसन्स काढूनच घ्यावे, अन्यथा परकीय कायद्याच्या फेऱ्यात अडकाल.
परदेशात जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) म्हणजेच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो. दरवर्षी औरंगाबादेत किमान २०० वाहनचालक आंतरराष्ट्रीय लायसन्स काढत असत. परंतु, गतवर्षी यात तब्बल ७४ टक्क्यांनी घट होत फक्त ५९ जणांनी हे लायसन्स काढले, तर यावर्षी आतापर्यंत ३१ जणांनी हे लायसन्स काढले आहे.
-------
किती जणांनी काढले इंटरनॅशनल लायसन्स
२०१७- १६९
२०१८- २०३
२०१९- २१६
२०२०- ५९
२०२१- ३१
------
मुदत एक वर्षाचीच
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत (वैधता) ही केवळ एक वर्षाची असते. याचा उपयोग अनेकदा अन्य देशांत ओळख पटविण्यासाठीही केला जातो.
- आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हा पुरावा आहे की, ज्या देशासाठी तो जारी केला, त्यासाठी वैध परवाना आहे.
- संबंधित देशात लायसन्सधारक वाहन चालवू शकतो, हे देखील आंतरराष्ट्रीय लायसन्समुळे प्रमाणित होते.
- भारतीयांना परदेशात वाहन भाड्याने घेण्यास आणि चालविण्यास आंतरराष्ट्रीय लायसन्समुळे मदत होते.
-----
तुम्हालाही काढायचे इंटरनॅशनल लायसन्स?
आंतरराष्ट्रीय लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो. अर्जासोबत पासपोर्ट, व्हिसा यासह येथील लायसन्सची प्रत असणे आवश्यक असते. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडावे लागते. यासाठी एक हजार रुपये शुल्क आहे. आरटीओ कार्यालयाकडून आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय लायसन्स दिले जाते.
----
कोरोनामुळे प्रमाण घटले
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिटची (आयडीपी) मुदत ही एक वर्षाची असते. अर्जदाराच्या पासपोर्ट आणि लायसन्सवरील पत्ता हा सारखाच असणे आवश्यक आहे. आवश्यक ती पडताळणी करून हे लायसन्स दिले जाते. कोरोना काळात हे लायसन्स काढण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
- स्वप्निल माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी