औरंगाबाद : घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची तयारी भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने सुरू केली आहे. महापालिकेच्या प्रभाग ७ व ९ मध्ये पहिल्या टप्प्यात काम सुरू होणार आहे. या भागात पाइप टाकण्यासाठी कंपनीने मनपाकडे परवानगी मागितली. खोदकामामुळे रस्त्याचे नुकसान होणार असल्याने १८ कोटी ८५ लाख रुपये महापालिकेला भरावेत, असे पत्र प्रशासनाने कंपनीला दिल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.
शहरासह वाळूज एमआयडीसी भागात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा व्हावा, यासाठी नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार, औरंगाबाद ते नगर पाइपलाइन टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. वाळूजपर्यंत पाइप टाकण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील दोन प्रभागांत घरोघरी एलपीजी गॅस पाइपलाइनद्वारे देण्याची तयारी कंपनीने केली. त्यानुसार, भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने महापालिकेला पत्र देत, प्रभाग सात व नऊमध्ये रस्त्याशेजारी पाइपलाइन टाकण्याची परवानगी मागितली. पाइप टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागणार आहे. त्या पोटीचा खर्च म्हणून महापालिकेला १८ कोटी ८५ लाख रुपये भरावेत, असे मनपातर्फे कळविण्यात आले.
----------------
रस्ते न फोडता काम करावे
महापालिकेने शहरात जवळपास ४०० कोटी रुपये खर्च करून सिमेंट, डांबरी रस्ते तयार केले आहेत. गॅस पाइपलाइनसाठी रस्ते फोडण्याची गरज नसल्याचे पानझडे यांनी सांगितले. कंपनीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, क्रॉसिंगच्या ठिकाणी मशीनचा वापर करण्याची सूचना केली जाणार आहे.
----------
या भागातील नागरिकांना फायदा
गॅस पाइपलाइनचे जाळे पूर्णपणे टाकण्यात आल्यानंतर, प्रभाग ७ म्हणजे जवाहर कॉलनी, प्रभाग ९ म्हणजेच क्रांती चौक वॉर्डातील वसाहतींना फायदा होणार आहे. ज्या भागात अधिकृत वसाहती आहेत, त्या भागात पहिल्या टप्प्यात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम कंपनीतर्फे करण्यात येणार आहे.