--------
शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णसेवा देत असताना सरकारी डाॅक्टरांनी खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस केली नाही पाहिजे. जर खासगीत प्रॅक्टिस करायचीच असेल, तर कोणतेही बंधन नाही. सरळ शासकीय नोकरी सोडून द्यावी. राजीनामे देऊन मोकळे व्हावे.
----------
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात (डीएमईआर) सहसंचालकपदी सेवा बजावल्यानंतर डॉ. एस. पी. डांगे यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पुन्हा पदभार घेतला. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना डाॅ. डांगे म्हणाले, मुंबईत काम करीत असताना ‘डेंटल’साठी आपण स्वतंत्र संचालकांची मागणी केली आहे. आताच्या संचालक कार्यालयात मेडिकलसह डेंटल आणि नर्सिंगचा समावेश आहे; परंतु या तिन्हींचे संचालक हे वेगवेगळे असण्याची गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचेच (मेडिकलचे) खूप प्रश्न आहेत. एकप्रकारे ते ओव्हरलोड झाले आहेत. त्यामुळे दंत महाविद्यालयांकडे (डेंटलकडे ) फारसे लक्षच दिले जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्याचे स्वतंत्र संचालक असावेत, अशी मागणी मी लावून धरली आहे.
कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतल्यानंतर ६ ते ८ महिने परिणाम राहतो, असे सांगितले जाते. तिसरा डोस घेणे गरजचे आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस मिक्स करून घेतली, ती तर प्रभावी ठरते, असेही म्हटले जाते; परंतु खात्रीपूर्वक कोणीच सांगत नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स, स्वच्छता, गर्दी टाळणे आणि मास्क घालणे हा स्वस्तातील इलाज आहे, असे डाॅ. डांगे यांनी सांगितले. सरकारी डाॅक्टरांनी खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करण्यासाठी नोकऱ्या सोडून दिल्या पाहिजे, असे ते म्हणाले.