औरंगाबाद : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरातील काही खासगी रुग्णालयेदेखील आता इंजेक्शन नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयाला इंजेक्शनची विचारणा केली जात आहे. परंतु इंजेक्शन बाहेर देण्यात येणार नाही. रुग्णाला पाच दिवसांसाठी घाटीत दाखल करा आणि रेमडेसिवीर घ्या, असा सल्ला घाटी प्रशासनाकडून दिला जात आहे.
पुणे, नांदेडसह राज्यातील अनेक शहरांत रेमडेसिवीर इंजेक्शन सहजपणे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शनची शोधाशोध केली जात आहे. या इंजेक्शनसाठी राज्यभरातून नागरिक औरंगाबादेत धाव घेत आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालयांतही इंजेक्शनचा तुटवडा असल्याची नोंद केंद्रीय पथकाने घेतली आहे. त्यामुळे पथकाने घाटीला इंजेक्शनच्या परिस्थितीविषयी विचारणा केली. तेव्हा इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याची माहिती घाटीने पथकाला दिली. या सगळ्यांत दोन दिवसांपासून घाटीला इंजेक्शनची मागणी केली जात आहे; परंतु इंजेक्शन दिले जाणार नाही. रुग्णाला घाटीत दाखल केल्यास रुग्णाला हे इंजेक्शन दिले जाईल, अशी भूमिका घाटी प्रशासनाने घेतली आहे. घाटीत महिनाभर पुरेल इतका रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
खासगीत कृत्रिम टंचाई?
शहरात इंजेक्शनचा तुटवडा नसल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. शहरातील एखादा रुग्णास इंजेक्शन मिळत नसेल तर औषध निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे; परंतु काही रुग्णालये इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण करीत असल्याची ओरड होत आहे.