औरंगाबाद : शासकीय विभागांमध्ये सध्या बदल्यांचा हंगाम सुरू आहे. इच्छित ठिकाणी बदली मिळवून देणारे रॅकेट कार्यरत झाले असून, बदली हवी असेल तर वरिष्ठांना पैसे द्यावे लागत असल्याचे उघडकीस येत आहे. पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्यास औरंगाबादेत बदलीसाठी १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने दोन कर्मचाऱ्यांना पकडल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणात दोन्ही लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील महिला अधिकारी फरार झाली आहे.
जालना येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने औरंगाबाद येथे विनंती बदलीसाठी अर्ज केला होता. या कर्मचाऱ्याला विनंती मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. संबंधित कर्मचारी ही लाच देऊ इच्छित नसल्यामुळे त्याने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी लघुपाटबंधारे विभागात सकाळी साडेअकरा वाजता सापळा लावला. मात्र, लाच मागणारे अधिकारी हुलकावणी देत असल्यामुळे दुपारी साडेचार वाजता लावलेला सापळा यशस्वी झाला. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनसुब रामराव बावस्कर (५७) यास लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. तसेच सहायक अभियंता वर्ग एकच्या अधिकारी संजीवनी गर्जे (५७) यांनी लाच घेण्यासाठी वरिष्ठ लिपिकाला प्रोत्साहन दिले. लाच स्वीकारण्याचे समर्थन केले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बावस्कर यास अटक करीत कार्यालयात आणले. यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, पोलीस अंमलदार रवींद्र काळे, राजेंद्र सिंनकर, अशोक नागरगोजे, चालक चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली आहे.
चौकट
एक आरोपी अटकेत, महिला अधिकाऱ्याला नोटीस
पाटबंधारे विभागात दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेला मनसुब बावस्कर यास अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस काेठडी सुनावण्यात आली. दुसरी आरोपी असलेल्या संजीवनी गर्जे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्या न्यायालयात हजर न होता फरार झाल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. रंगेहाथ पकडलेला आरोपी फरार झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.