छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, असे असताना आपले पुढारीपण टिकविण्यासाठी काही जण सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत आहे, त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे, मग आपली जी, भूमिका घ्यायची ती घ्यावी,असा खोचक सल्ला शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.
आ. सिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या धाडसाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर अनेकांचा पोटशूळ उठला आहे. मुळामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे आरक्षण देऊ नये, यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले हाेते. राज्यसरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्यभर जल्लोष करीत असल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ द्यायची स्पष्ट भूमिका सरकारची आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात सुरू झालेली कोल्हेकुही थांबवावी. सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात तुम्ही भूमिका घेत आहात. यातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहात. कोणी सरकारमध्ये राहावे अथवा बाहेर पडावे, याविषयी मी सांगणार नाही. मात्र सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत असाल तर त्यातून एक वाईट मेसेज जातो. यामुळे आधी तुम्ही सरकारमधून बाहेर पडावे नंतर काय भूमिका घ्यायची ती घ्यावी, आंदोलन करायचे ते करावे, असा सल्लाही त्यांनी मंत्री भूजबळांना दिला.