बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावर दहा दिवसांपूर्वी नवीन दिशादर्शक फलक बसविण्यात आले. मात्र या फलकावर दर्शविण्यात आलेले अंतर चुकीचे आहे. वेगवेगळ्या फलकावर वेगवेगळे अंतर असल्याचे दर्शवून सा.बां. विभागाने आपले अज्ञान उघड केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, तुळजापूर, उस्मानाबाद आदी मुख्य शहरांना कोणत्या दिशेने जायचे या विषयी दिशादर्शक फलक लावले आहेत. यावर दिशा व अंतर आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तीन ते चार ठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील व पाठीमागच्या बाजूस असलेल्या फलकावर सोलापूर १९१ कि.मी. असल्याचे दाखविले आहे. तर जि.प. समोरील फलकावर १७८ कि.मी. अंतर सोलापूर ते बीड असल्याचे दर्शविले आहे. ही तफावत वाहनधारकांना संभ्रमात पाडणारी असल्याने संताप व्यक्त होत आहे. सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत बाविस्कर यांनी आपल्याला याबद्दल कुठलीच माहिती नसल्याचे सांगून हात झटकले. (प्रतिनिधी)
सा.बां.विभागाचे अज्ञान उघड
By admin | Published: September 29, 2014 12:02 AM