औरंगाबाद : दोन वेळा आदेशाचे पालन केले नाही म्हणून विद्यापीठ न्यायाधिकरणाचे पीठासन अधिकारी न्या. सुनील कोतवाल यांनी जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मोहन बापूराव बिरादार व संस्थाचालक जनार्दन लक्ष्मणराव म्हस्के यांना ६ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
हा दंड विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या खात्यात ३ महिन्यांच्या आत जमा करावा. निकाल लागल्यापासून प्रा. डॉ. सतीश सांडू ठोंबरे यांना ३ महिन्यांच्या आत बडतर्फ काळातील सर्व थकीत वेतन द्यावे, जोपर्यंत बडतर्फ काळातील सर्व वेतन देणार नाहीत, तोपर्यंत प्रभारी प्राचार्य व संस्थाचालक यांना दररोज ५०० रुपये दंड चालू राहील, असे आदेशात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सतीश ठोंबरे यांना संस्थेने किरकोळ कारणावरून सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांना सेवेत रुजू करून घेण्याचे व बडतर्फ काळातील सर्व वेतन व लाभ प्रभारी प्राचार्य व संस्थाचालकाने द्यावेत, असे आदेश विद्यापीठ न्यायाधिकरणाने २४ फेब्रुवारी २०२० रोजी दिले होते. परंतु या पहिल्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी न करता अर्धवट अंमलबजावणी केली व प्राध्यापक डॉ. ठोंबरे यांना फक्त सेवेत रुजू करून घेतले. बडतर्फ काळातील वेतन दिले नाही, म्हणून प्रा. ठोंबरे यांनी पुन्हा न्यायाधिकरणात अवमान अपील दाखल केले.सुनावणीअंती न्यायाधिकरणाने वरील दोघांना प्रथम आदेश पाळले नाहीत म्हणून एक लाख व दुसरे आदेश पाळले नाहीत म्हणून ५ लाख असा एकूण ६ लाख रुपये दंड ठोठावला आहे.