औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामासाठी महसूल प्रशासनातील सुमारे ११ हजार ३४० कर्मचारी गुंतले होते. यातील एकाही कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट निवडणूक कामकाजात असताना आणि कामकाज संपल्यावर केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर मोठ्या निवडणुकींसाठी पूर्ण तपशीलवार आणि आरोग्याची काळजी घेत असल्याचे दाखवून प्रशासनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, ग्लोज, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टन्सिंगचा प्रचार आणि प्रसार केला. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी प्रशासनाने घेतली नाही. वाऱ्यावरच्या वरातीप्रमाणे निवडणुका घेण्यात आल्या.
दरम्यान, नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले, निवडणुकीच्या कामकाजात आणि प्रशिक्षणादरम्यान कुठल्याही कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट झालेली नाही. सोमवारी मतमोजणी संपल्यानंतर प्रत्येकजण तणावातून मुक्त झाले; परंतु कोरोना चाचणी न केल्यामुळे भीतीचे वातावरण प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र, समोर बोलण्यास कुणीही पुढे येणार नाही.
निवडणुकीत असे उमेदवार अशी यंत्रणा
जिल्ह्यातील ग्रामपंचायती - ६१७
मतदान किती ग्रामपंचायतींसाठी - ५७९
प्रभाग - २०९०
एकूण उमेदवार - ११ हजार ४९९
महिला उमेदवार - ६ हजार
बिनविरोध झालेली ग्रामपंचायती -३५
बिनविरोध प्रभाग - १८३
बिनविरोध उमेदवार - ६१०
क्षेत्रीय अधिकारी - ११३
कर्मचारी - ११,३४० हजार
प्रशासनाच्या कानावर घालण्यात येईल
याबाबत ग्रामीण तहसीलदार शंकर लाड म्हणाले, निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात येईल.
लेखी आदेशाच्या कचाट्यात टेस्टची प्रक्रिया
जिल्हा आरोग्य विभागाला जिल्हा प्रशासनाकडून आजवर लेखी आदेश न मिळाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दोन हजार ९० प्रभागांच्या निवडणूक मैदानात असलेल्या सुमारे ११ हजार ४९९ उमेदवारांची कोरोना टेस्टची प्रक्रिया झालीच नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बीडीओ आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी स्क्रीनिंग केले. सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर, थर्मलगनचा वापर करण्यात आला, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती अशी..
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी सांगितले, जिल्हा निवडणूक शाखेला निवडणुकीतील कर्मचारी आणि उमेदवारांची कोरोना टेस्ट करून घेण्याबाबत वारंवार कळविले; परंतु लेखी आदेश दिले नाही. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत काही माहिती दिली नाही. आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली होती.