औरंगाबाद: प्लॅटफॉर्मवर उभे राहून धावत्या मालगाडी रेल्वेसोबत सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे पडलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे घडली. सोबतचे मित्र ओरडत होते; मात्र त्यांच्याकडे तरुणाने दुर्लक्ष केले आणि क्षणार्धात ही घटना घडली.
शेख शोएब शेख महेबूब (२०, रा. पटेलनगर, चिकलठाणा) असे मयताचे नाव आहे. शोएब पटेलनगरात लहान भाऊ आणि आई-वडिलांसोबत राहत होता. तो शेंद्रा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामाला होता. मंगळवारी (दि. १८) दुपारी तो आणि त्याचे चार ते पाच मित्र चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात फिरायला गेले होते. सर्व जण आपल्या मोबाईलवर छायाचित्रे काढत होते. शोएब हा मोबाईलवर सेल्फी काढत होता. मालवाहू रेल्वेगाडी येत असल्याचे त्यांना दिसले. शोएब प्लॅटफॉर्मवर उभा राहिला आणि धावणाऱ्या रेल्वेसोबत मोबाईलवर सेल्फी काढू लागला. हॉर्न वाजवित गाडी रेल्वेस्थानकातून जात असताना अचानक तोल जाऊन तो रेल्वेच्या दिशेने पडला. धावत्या रेल्वेच्या डब्याला धडकून तो रुळ आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये कोसळला.
या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एक पाय तुटला. त्याच्या मित्रांनी त्याला तेथून उचलून प्लॅटफॉर्मवर आणून बसवले. गंभीर जखमी असताना शोएबने त्याच्या मामाला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्याचे मामा आणि अन्य मित्रांनी त्याला वाहनातून घाटी रुग्णालयात नेले. या प्रवासात तो त्यांना बोलता-बोलता बेशुद्ध झाला. घाटीत दाखल केले असता अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार बावस्कर पुढील तपास करीत आहेत.