औरंगाबाद : ‘मी पुन्हा येईन...पण दिवसा उजेडी येईन. पहाटेचा शपथविधी नसेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.अजित पवार यांच्यासमवेत पहाटे शपथविधी घेऊन सरकार बनविण्याच्या प्रयोगाला २३ नोव्हेंबर २०२० रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त पत्रकारांनी छेडले असता फडणवीस म्हणाले, त्या पहाटेच्या शपथविधीचे रहस्य तुम्हाला लवकरच एका पुस्तकाद्वारे समजेल. परंतु यापुढे जेव्हा शपथ घेण्याची वेळ येईल तेव्हा तो सोहळा दिवसा असेल. पहाटे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘आज त्या दिवसाची आठवण आली की नाही?’, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, तसल्या आठवणी काही लक्षात ठेवायच्या नसतात. या सरकारने कितीही वर्ष सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहिले तरी जनतेने त्यांना निवडून दिलेले नाही.
...तर जनता आम्हाला माफ करणार नाहीप्रशासनातील सावळागोंधळ विरोधक म्हणून आम्ही बाहेर काढला नाही तर जनता आम्हाला माफ करणार नाही. मंदिर उघडा म्हटल्यावर एवढे वाईट का वाटले. मद्यालये उघडताना विचार केला नाही. मंदिरात सोशल डिस्टन्स पाळले जावे. ते होत नसेल तर ते बंद करावे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, असाच प्रयत्न करावा लागेल. दिल्लीत थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोना वाढतो आहे. जानेवारीअखेरीस लस आली तर चांगलेच होईल, असे ते म्हणाले.