औरंगाबाद : २५० वॅटपेक्षा कमी क्षमता व वेगमर्यादा ताशी २५ कि.मी. पेक्षा कमी आहे, अशी ई-दुचाकी डबलसीट ५५ कि.मी.च्या स्पीडने धावत असल्याचे पाहून आरटीओ अधिकारीही थक्क झाले. बेकायदा बदल केल्याप्रकरणी १२ ई-दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यातील ५ ई-दुचाकी आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
ई-दुचाकी वाहनांमध्ये बेकायदा बदल करून विक्री करण्याचा प्रकार परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आला. अशा बेकायदा बदलामुळे ई-दुचाकींना आग लागून अपघाताच्या घटना होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे औरंगाबादसह राज्यभरात वाहन उत्पादक आणि वितरकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. २३ आणि २४ मे रोजी १२ विक्रेत्यांकडील, तसेच रस्त्यावर धावणाऱ्या ३९ ई-दुचाकींची आरटीओ कार्यालयाच्या पथकाने तपासणी केली. यात १२ ई-दुचाकी या नमूद क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या असल्याचे आढळून आले. यात ७ वाहने ही विक्रेत्यांकडेच अडकवून ठेवण्यात आली, तर ५ वाहने जप्त करून आरटीओ कार्यालयात आणण्यात आली.
अशी आहे स्थिती२५० वॅटपेक्षा कमी क्षमता व वेगमर्यादा ताशी २५ कि.मी. पेक्षा कमी आहे, अशा ई-दुचाकींना नोंदणीपासून सूट देण्यात आलेली आहे. काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-दुचाकींची विक्री करीत आहेत, तर काही जणांकडून वाहनांमध्ये बेकायदा बदल केला जात आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढून दुर्घटनेला हातभार लागत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहवालानंतर कारवाईजप्त केलेल्या ई-दुचाकींची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून तपासणी करण्यात येईल. वाहनावर नमूद केल्याप्रमाणे त्यांची क्षमता आहे की त्यात काही बदल केला आहे, याची पडताळणी होईल. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- संजय मेत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी