पैठण तालुक्यातील हिरडपुरी व गेवराई तालुक्यातील गुळजदरम्यान फेब्रुवारी महिन्यात वाळू तस्करांनी गोदावरी पात्रात अवैधरित्या सेतू उभारून वाळू वाहतूक सुरू केली होती. जायकवाडी प्रशासन व महसूल विभागासह पोलिसांचे अभय मिळाल्याने तस्करांनी ही हिंमत केली होती. तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना धमक्या व मारहाण करून तस्करांनी परिसरात दहशत निर्माण केल्याने याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नव्हते. या सेतूवरून दोन्ही तालुक्यातील तस्करांनी बिनबोभाट वाळू वाहतूक केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाशी साटेलोटे असल्याने तस्करांची हिंमत वाढली होती.
सेतूची अवैध छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी एप्रिल महिन्यात पथकासह हिरडपुरी येथे जाऊन या अवैध सेतूची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी २३ एप्रिल रोजी जायकवाडीच्या उपविभागीय अभियंत्यांना हा सेतू तोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर सेतू तोडण्यासाठी आलेल्या पथकाला धुडगुस घालून तस्करांनी रोखल्यानंतर पथक परत गेले होते. गत आठवड्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गोदावरी पात्रात पाहणी केली, त्यावेळी त्यांच्या नजरेतून हा सेतू सुटला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने तस्करांची हिंमत खचली व त्यांनी रात्रीतून सेतू फोडल्याची चर्चा सुरू आहे.
चौकट
प्रशासनाचे हात वर
या अवैध सेतूवरून अनेक व्हीआयपी लोकांच्या गाड्या वाहतूक करीत होत्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही गाड्या चालत असल्याने या सेतूला कुणी हात लावत नव्हते. असे ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, हा सेतू कुणी तोडला या बाबत तहसीलदार, पाटबंधारे खात्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मात्र हात वर केले.
फोटो : तोडण्यात आलेला हाच तो अवैध सेतू.
210621\img_20210621_191529.jpg
तोडण्यात आलेला हाच तो अवैध सेतू.