वाळूज महानगर: वाळूमाफियांनी वाळूने भरलेल्या दोन हायवा पळविल्याच्या घटनेनंतर नाचक्की झालेल्या वाळूज पोलिसांना उशिरा शहाणपण सूचले आहे. मागील घटनेतून बोध घेत वाळूज पोलिसांनी शनिवारी वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा जप्त करुन चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महसूल प्रशासनाने शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफिया विरुद्ध कारवाईचा बडगा उगारत परिसरात छापेमारी सुरु केली आहे. महसूल पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनावर कारवाई करुन दोन हायवा जप्त केल्या होत्या. यापैकी एक वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केला तर दुसरा पोलीस पाटील यांच्या हवाली केला होता. मात्र वाळू माफियांनी दोन्ही हायवा पळविल्यामुळे वाळूज पोलिसांची नाचक्की झाली.
त्यानंतर वाळूज पोलीस ठाण्याचे पोकाँ. किशोर साबळे हे शनिवारी येथील जुन्या थम्सअप चौकात गस्तीवर असताना त्यांना सकाळी ६ वाजता हायवा ट्रक (एचमएच - २०, डीई-७२२२) हा वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आला. साबळे यांनी हायवा अडवून पाहणी केली असता हायवात ४ ब्रास वाळू असल्याचे दिसून आले. चालक सुखदेव खरात याच्याकडे वाळू वाहतूक व हायवाच्या कागदपत्राविषयी चौकशी केली असता त्याने कोणतीच कागदपत्रे नसल्याचे सांगून हायवा मालक नारायण चनघटे असल्याचे सांगितले.
साबळे यांनी ही माहिती पोकाँ. ज्ञानेश्वर माने व राजाराम डाखुरे यांना दिली. माने व डाखुरे यांनी घटनास्थळी येवून वाळूने भरलेला हायवा जप्त करुन पोलीस ठाण्यात आणला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात पोकाँ. साबळे यांच्या फिर्यादीवरुन चालक सुखदेव खरात (रा. पिंपरखेडा) व मालक नारायण चनघटे (रा. मेहंदीपूर) या दोघांविरुद्ध वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्ररणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.