पैठण : सन २०१६ मध्ये घरासमोर अवैध देशी दारू विक्री केल्या प्रकरणी पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील एकास तीन वर्षाचा तुरूंगवास व २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा पैठण न्यायालयाने सोमवारी सुनावली आहे. या निकालामुळे तालुक्यात गावागावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांना निश्चितच चाप बसणार आहे.
अक्षय बालाप्रसाद जैस्वाल ( वय ३४, रा. बोकुड जळगाव ता पैठण) असे दारू विक्री करणाऱ्याचे नाव असून न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी ही शिक्षा सुनावली. आतापर्यंत अनेक वेळा अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. मात्र दारू विक्री करणाऱ्यास शिक्षा झाल्याचे यापूर्वी एकीवात नाही. कारवाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी जामीन व तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच धंदा असा प्रकार होत असल्याने विनापरवाना गावागावात होणारा दारूचा अक्षय पुरवठा कधीही खंडित झालेला नाही. दारूमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली तर कमी वयातील तरूणांना दारूचे व्यसन लागल्याने अनेकांना अकाली मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. यामुळे दारूच्या विक्रीबाबत समाजात मोठा रोष निर्माण झालेला आहे. मात्र पैठण न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या मद्य तस्करात मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य जनतेतून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
काय होते प्रकरण बिडकीन पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उप निरीक्षक ऐतवार, दुल्लत हे २०१६ ला निलजगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना बोकुड जळगाव येथे अक्षय बालाप्रसाद जैस्वाल हा त्याच्या घरासमोर विनापरवाना अवैध देशी दारू विक्री करत असल्याची खबर मिळाली. पंचासह जाऊन पोलिस उपनिरीक्षक ऐतवार, दुल्लत, पोलीस कॉन्स्टेबल बाळू लोणे, महिला कॉन्स्टेबल दिपाली फुले उषा ब्राम्हणे, कांबळे यांनी बोकुडजळगाव येथील घरावर छापा मारला. यावेळी अक्षय बालाप्रसाद जैस्वाल पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी त्याच्या घरातून १५ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुनील सुरासे यांनी गुणवत्तापूर्ण तपास करून पैठण येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी अभियोक्ता अनिल शिंपी यांनी या प्रकरणातील पंच कचरू गाढेकर, उषा ब्राम्हणे, दिपाली फुले, बाळू लोणे, सुनील सुरासे या ४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून आरोपी अक्षय जैस्वाल याने विनापरवाना दारू विक्री केल्याचा गुन्हा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी न्यायालयास या प्रकरणी प्रशासकीय मदत केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तसेच साक्षीपुरावे तपासून पैठण न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. भावसार यांनी आरोपी अक्षय जैस्वाल यास सोमवारी तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा व २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. बिडकीन पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला कॉन्स्टेबल दिपाली फुले यांची या प्रकरणात साक्ष महत्वाची ठरली तर महिला कॉन्स्टेबल उषा ब्राम्हणे यांनी जप्त केलेल्या बाटलीत दारूच असल्याचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पाठपुरावा करून मिळवले होते. दोन्ही महिला कॉन्स्टेबलच्या कामगिरीने आरोपीला शिक्षा झाली.