चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून शासकीय परवानगी नसताना नदीपात्रातील आठही वाळूघाटांतून अवैध वाळूउपसा सुरू आहे. अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नियंत्रण ठेवणारे महसूल व पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. पाच वर्षांपासून राजरोसपणे शासनाच्या गौण खनिज मालमतेची लूट होत असताना मात्र संबंधित यंत्रणेने ''''आपण सगळे मिळून खाऊ'''' ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ही वाळू चांगल्या दर्जाची असल्याने तिला भावही चांगला मिळत असल्याने वाळूमाफियांचा डोळा पूर्णा नदीपात्रातील वाळूच्या उपशावर असतो. पूर्णा नदीकाठी वाकी, चिंचोली लिंबाजी, बरकतपूर, रायगाव, वाकद, शेलगाव, दिगाव, खेडी हे वाळूचे अधिकृत पट्टे आहेत. सरकारी नोंदीनुसार कुठल्याच वाळूपट्टयातून उपसा करण्याची परवानगी नाही, पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट असून सर्रासपणे महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून परिसरात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे.
----------------------------------------
नागरिकांना होतो त्रास
पूर्णा नदीपात्रातील वाकद, शेलगाव वगळता सहाही वाळू घाटात व रस्त्यांवर रात्रभर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरांच्या रांगा दिसून येतात. रात्रभर सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे. मात्र, जबाबदार महसूल व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. किंबहुना अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
------------------------------------
सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र
सूर्य मावळल्यानंतर बरकतीला येणाऱ्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल हाेते. वाळूचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असली तरी ते आपल्या कुंपणाबाहेर जात नसल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र दिवसेंदिवस रुंद होत असून अनेकांच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. यास काही प्रमाणास नदीकाठचे शेतकरीसुद्धा जबाबदार आहेत. पूर्वी नदीकाठचे शेतकरी नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशाला विरोध करायचे. त्यामुळे शेतकरी आणि वाळू माफियांत वाद होत. मात्र, नदीकाठच्या शेतकाऱ्यांनीच वाळूविक्री सुरू केल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे.
---------------------------
- वाकी वाळूपट्ट्यातील उपशामुळे नदीपात्र असे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.
- दिगाव वाळूपट्ट्यात उतरण्यासाठी असा रस्ता तयार करण्यात आला आहे.