औरंगाबाद : पिण्याचे पाणी शुद्ध, निर्जंतुक असावे, असे प्रत्येकाला वाटते. आपण ज्या ठिकाणाहून नळ कनेक्शन घेतोय, तेथे आजूबाजूला दूषित पाणी तर वाहत नाही, याची काळजीही घेतो. मात्र, चिकलठाणा येथे काही नागरिकांनी मनपाच्या मुख्य जलवाहिनीची चाळणी करीत चक्क गटारीतून शेकडो अवैध कनेक्शन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. मनपाच्या विशेष पथकाने ६१ अनधिकृत नळ खंडित केले. उद्याही याच ठिकाणी कारवाई सुरू राहणार आहे.
शहरात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. नवीन वसाहतींना पाणी देण्याची तरतूद मनपाकडे नाही. घरापासून लांब अंतरावर मनपाची जलवाहिनी जात असल्याचे कळताच नागरिक अवैध नळ कनेक्शन घेऊन मोकळे होतात. शहरातील अवैध नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी मनपाने तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथक बुधवारी सकाळीच चिकलठाणा येथे मुख्य जलवाहिनीच्या तपासणीसाठी दाखल झाले. या मुख्य जलवाहिनीच्या बाजूने छोटी गटारही आहे.
नागरिकांनी मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार पाहून मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. एवढ्या दूषित पाण्यातून नळ कनेक्शन नेलेच कसे, असा प्रश्न उपस्थितांना पडला. एकाच ठिकाणी तब्बल २११ अवैध नळ आढळले. नालीतील ढाप्यांखाली अनेक नळ आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना हे नळ कापायला बराच त्रास होत होता.